
मुंबई, 19 मार्च (हिं.स.)।
झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं ज्यामध्ये एका दारावर काही जणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यातील डोळे नेमके कुणाचे आहेत? हे कलाकार कोण आहेत? या काळया पोपटाचे रहस्य काय ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. सोबतीला गावात सारी चर्चा रे गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत अशा गाण्याच्या ओळी ऐकायला येत आहेत. यामुळे या गावाबद्दलची यातील कलाकाराबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
या आगळ्यावेगळ्या पोस्टरबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, तुंबाडची मंजुळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अनेक वर्षानंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा, त्याचा विषय अतिशय मनोरंजक असल्यामुळे याबद्दल प्रदर्शित होणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उत्सुकतापूर्ण तथा वेगळी असावी या विचारानेच या पोस्टरची ही कल्पना आम्हाला सुचली. या पोस्टर मध्ये दिसणारे गाव आणि हे गावकरी सर्वच अतरंगी असून आता टप्प्याटप्प्याने यातील एक एक गोष्ट उघड करू ज्यामुळे सर्वांची उत्कंठा आणखीनच वाढेल हे निश्चित.
झी स्टुडिओजच्या वतीने उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर विविध कोरगांवकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर