अमरावती-तळवेल येथील 180 पट्टाधारकांचा 22 वर्षांचा प्रश्न मार्गी
अमरावती, 02 मार्च (हिं.स.)चांदूरबाजार तालुक्यातील तळवेल येथील १८० घरकुल पट्टाधारकांचा तब्बल २२ वर्षांपासून प्रलंबित असलेला वारसाहक्काचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबप्रमुखांच्या निधनानंतर घरकुलाच्या पट्ट्यावर वारसांची नावे नोंदवण्य
अमरावती-तळवेल येथील 180 पट्टाधारकांचा 22 वर्षांचा प्रश्न मार्गी


अमरावती, 02 मार्च (हिं.स.)चांदूरबाजार तालुक्यातील तळवेल येथील १८० घरकुल पट्टाधारकांचा तब्बल २२ वर्षांपासून प्रलंबित असलेला वारसाहक्काचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबप्रमुखांच्या निधनानंतर घरकुलाच्या पट्ट्यावर वारसांची नावे नोंदवण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर होणार आहेत. आमदारांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या जनता दरबारात यावर निर्णय घेण्यात आला.

नागरिकांच्या माहितीनुसार, २००४ पासून घरमालकांच्या वारसांनी तहसील कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता, मात्र त्यांना यश मिळाले नव्हते. आता आमदार प्रवीण तायडे यांनी पुढाकार घेतल्याने या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. तळवेल येथील सुमारे १४० पट्टाधारकांनी आमदारांकडे आपली कैफियत मांडली होती.

त्यानंतर आमदार तायडे यांनी गावात सर्व पट्टाधारकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक लाभार्थ्याचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या नव्या महसूल धोरणानुसार, सर्व १८० नागरिकांना लवकरच वारसाहक्काचे पट्टे मिळण्याची शक्यता आहे.वारसांच्या नावे पट्टे झाल्यानंतर संबंधित लाभार्थी नव्या घरकुल योजनांसाठी पात्र ठरतील आणि त्यांच्या निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) बळवंत अरखराव यांनी यासंदर्भात माहिती दिली.

अरखराव म्हणाले की, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे शासकीय दारात फिरूनही न्याय मिळाला नव्हता. आमदारांनी स्वतः पुढाकार घेतल्याने दिलासा मिळाला आहे. प्रशासकीय स्तरावर जलद कार्यवाही करून घरकुल व मालकी हक्काचा प्रश्न लवकरच कायमचा सोडवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande