
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)सोलापूर शहरातून अनेक वर्षांपासून लुप्त झालेली आदिला नदी ही प्रत्यक्षात नदीच असून तिला नाला समजण्याची गंभीर चूक प्रशासनाने करू नये, असा जोरदार इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी आदिला नदी नसून नाला असल्याचे विधान करत लेआउट व बांधकाम परवान्यांबाबत भूमिका मांडली होती. मात्र या वक्तव्यावर पर्यावरण अभ्यासक आणि नागरिक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला आहे. आदिला नदीचे अस्तित्व नाकारल्यास महापुराचे संकट अटळ असल्याचा गर्भित इशारा देखिल पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.पर्यावरण प्रेमींच्या मते, शहरातील वाढते शहरीकरण, अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांमुळे आदिला नदीचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. नदीचे पात्र अरुंद झाले असून अनेक ठिकाणी बांधकाम परवान्यांमुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळ्यात आला आहे. नदीला नाला समजून परवानग्या देण्याची प्रक्रिया चालू केल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड