
अमरावती, 02 मार्च (हिं.स.) : चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबादेवी मंदिर व श्री एकवीरा देवी मंदिर मंगळवार, ३ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी हे निर्बंध लागू राहणार आहेत. ज्योतिषाचार्य पं. संजय शहाकर गुरुजी यांच्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी चंद्रग्रहणास सुरुवात होणार आहे. त्या वेळी चंद्र आकाशात दिसणार नसून तो पूर्व क्षितिजाखाली असेल. मात्र, दुपारी २ वाजतापासूनच ग्रहणाचे वेध सुरू होतील. सायंकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी शहरात चंद्रोदय होईल आणि त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू असणार आहे. सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल. आकाश निरभ्र राहिल्यास अमरावतीत सुमारे २४ मिनिटे ग्रहण दृश्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. ग्रहण सुटल्यानंतरही वेध रात्री ८ वाजेपर्यंत राहणार असल्यामुळे मंदिर प्रशासनाने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ८ नंतर मंदिराची स्वच्छता करून देवींचा अभिषेक, पूजन, शृंगार व आरती करण्यात येईल. त्यानंतरच भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येणार असल्याचे संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी