
रायगड, 02 मार्च (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील मौजे माडप गावच्या हद्दीत पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लेन क्रमांक 2 वर हा थरारक प्रकार घडला. भरधाव वेग, जळणारा ट्रक आणि चालकाची घाबरगुंडी यामुळे तीन वाहनांचा साखळी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रा. मु.पो. देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांच्या मालकीचा आयशर टेम्पो (क्र. एमएच 13/ईपी/2281) हा चालक स्वतः चालवत मुंबईकडे जात होता. त्याचवेळी लेन क्रमांक 3 च्या बाजूला एक ट्रक जळत उभी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातील ट्रेलर (क्र. जीजे 27/टीडी 0818) हा लेन क्रमांक 3 वरून जात असताना अचानक जळणाऱ्या ट्रकचा भडका उडाला. या अचानक झालेल्या आगीच्या भडक्याने ट्रेलर चालक घाबरला आणि त्याने क्षणाचाही विचार न करता ट्रेलर थेट लेन क्रमांक 2 मध्ये वळवला. यामुळे लेन 2 मधून प्रवास करणाऱ्या ब्लॅक स्कॉर्पिओ (क्र. एमएच 23/बीएन 7774) ला जोरदार धडक बसली. या धडकेनंतर ट्रेलरचा मागील भाग फिर्यादीच्या आयशर टेम्पोच्या समोरील भागास घासून भीषण अपघात झाला. या साखळी अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित ट्रेलर चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुरनं. 70/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 125 (अ), 125 (ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शेळके करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके