
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.) । कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे सुरू करण्यासाठी तसेच ती गावागावात पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुलभ दळणवळणाची सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी, शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवताना येणारे अडथळे तसेच आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून कार्यपद्धती अधिक सोपी, सुलभ आणि वेळबद्ध करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. गावनिहाय प्राधान्यक्रम ठरवणे, तांत्रिक मानके निश्चित करणे, निधी नियोजन आणि कामांच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट दिशा ठरविण्यात आली.
बळीराजाच्या श्रमाला योग्य सन्मान देत शेतापर्यंत मजबूत रस्ते उभारण्याचा आणि ग्रामीण विकासाची वाट अधिक सुकर करण्याचा निर्धार या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis