
कोल्हापूर, 02 मार्च (हिं.स.) कोल्हापुरातील गेली अनेक वर्षे बंद असलेली ऐतिहासिक शाहू मिल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती, समस्त मातंग समाज आणि शाहू मिल कामगार संघटनेने नव्याने आंदोलन छेडले आहे. मिल परिसरात राजर्षी शाहू महाराज यांचे भव्य व योग्य स्मारक उभारावे, अशीही आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस शाहू महाराज (खासदार) यांच्या अध्यक्षतेखाली विविध पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग विभागाकडे तत्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रॉपर्टी कार्डवर कोणत्याही संस्थेचा बोजा नसल्याचे सांगत, शाहू मिलच्या २७ एकर जागेवर लँड माफियांचा डोळा असल्याचा आरोप केला. कोल्हापुरातील हेरिटेज जमिनी हडप करण्याचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला. संभाजी जगदाळे यांनी संपूर्ण २७ एकर जागा मिलसाठीच राखून ठेवावी, अशी सूचना केली.
बैठकीत विजय देवणे यांनी मिलची इमारत व जागा उपलब्ध असल्याचे सांगत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे ठोस मागणी करण्याचे आवाहन केले.
ऍड. बाबा इंदुलकर यांनी माहिती दिली की, १९६७ मध्ये शाहू मिल वस्त्रोद्योग विभागाकडे हस्तांतरित झाली आणि २००३ मध्ये ती बंद पडली. २७ पैकी १७ एकर जागा हेरिटेजमध्ये येत असल्याने, शाहू महाराजांच्या विचारांचा सन्मान राखत मिल पुन्हा सुरू करावी, असे मत त्यांनी मांडले.
अशोक भंडारी यांनी मागील ४० वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करत, बहुजन समाजाच्या हाताला काम देण्यासाठी ही मिल उभी राहिल्याचे सांगितले. मिल सुरू झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले. शिवाजी कवाळे यांनी शाहू मिलचे पुनरुज्जीवन म्हणजे इतिहासाचे नवे पान उलगडणे आणि शाहू महाराजांचे जिवंत स्मारक उभे राहणे होय, असे मत व्यक्त केले.
प्रशासनाचा पाठपुरावा सुरू
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित जागेबाबत न्यायालयीन प्रकरणे सुरू असल्याची माहिती दिली. ही जागा वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारित असल्याने पालकमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमुळे आंदोलनाला अधिकृत आधार मिळाल्याचे मानले जात आहे. कोल्हापुरातील कापड व्यवसायातील नामवंत कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर शाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजेल, असा समर्थकांचा ठाम विश्वास आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar