
लातूर, 02 मार्च (हिं.स.)।शहरातील अनधिकृत बॅनर तात्काळ हटवण्याचे आणि वारंवार बॅनर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी दिले.
सोमवारी अतिक्रमण हटाव विभागाच्या बैठकीत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर भूमिका घेण्यास सांगितले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड, डॉ. पंजाबराव खानसोळे, अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष रणदिवे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त मानसी म्हणाल्या, शहरात ठिकठिकाणी दिसणारे अनधिकृत बॅनर तात्काळ काढून संबंधितांना नोटीस द्यावी आणि दंडात्मक कारवाई करावी. तरीही पुन्हा बॅनर लावल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत.तसेच शहरात काही निश्चित ठिकाणी शुल्क आकारून अल्पकाळासाठी बॅनर लावण्यास परवानगी देण्याची शक्यता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रमुख चौक व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे शोधून त्यावर सतत लक्ष ठेवण्यास आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी नियमित गस्त घालण्याचे आदेशही देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis