
कोल्हापूर, 02 मार्च (हिं.स.) जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण १२२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी महसूल विभागाशी संबंधित ३८ अर्जांची नोंद झाली. महसूल शाखेंतर्गत करवीर तहसील कार्यालयाकडे ५, पन्हाळा तहसील कार्यालयाकडे ११, तर इतर महसूल कार्यालयांकडे २२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
विविध विभागांकडे ८४ अर्ज
इतर शासकीय विभागांकडे एकूण ८४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्वाधिक १९ अर्जांची नोंद झाली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद कडे १८, भूमी अभिलेख विभागाकडे १०, इचलकरंजी महानगरपालिका कडे ८, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) कडे ८ आणि कोल्हापूर महानगरपालिका कडे ७ अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित इतर विभागांकडे १४ अर्ज दाखल झाले.
नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना वेळेत न्याय देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमारे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar