
कोल्हापूर, २ मार्च (हिं.स.) किरकोळ कारणांवरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण सध्या वाढत असून पती-पत्नीने परस्पर सामंजस्याने वागणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी केले. कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम असून ते खऱ्या अर्थाने दुवा म्हणून कार्य करते, असेही त्या म्हणाल्या.
कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर डिस्ट्रीक बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-४ तथा कौटुंबिक न्यायालय सल्लागार समिती सदस्य एस.एस. तांबे बार असोसिएशन अध्यक्ष व्ही. आर. पाटील तसेच कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन अध्यक्ष आर.व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायाधीश श्रीमती वाईकर पुढे म्हणाल्या की, पती-पत्नींमध्ये परस्परांवरील आदरभाव आणि प्रेम वाढणे आवश्यक आहे. न्यायालयाची पायरी चढण्यापूर्वी त्यांनी संवाद साधून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करावा. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी केले. बार असोसिएशन अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी पती-पत्नींमध्ये तसेच कुटुंबामध्ये न्याय व सलोखा दृढ करण्यासाठी कार्यरत विधिज्ञांचा सन्मान करण्यात आला. समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा संसारवेल फुललेल्या प्रत्येकी सात दांपत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प (रोप), स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला. काही दांपत्यांनी आणि विधिज्ञांनी आपले अनुभव व विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ओंकार तुळसुलकर यांनी केले. सूत्रसंचालन विनोद भिलारे यांनी तर आभार प्रदर्शन कौटुंबिक न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक महेश पाटील यांनी केले.
यावेळी नव्या समुपदेशन कक्षाचे उद्घाटन न्यायाधीश एस. एस. तांबे आणि न्यायाधीश अपर्णा वाईकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास इतर विभागांचे न्यायाधीश तसेच विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar