
लातूर, 02 मार्च (हिं.स.)।
राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या मागणीसाठी गुरुवार, ५ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर तब्बल २५ हजार युवक-युवतींचे भव्य जेलभरो आंदोलन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ सहाय्यक संघटनेचे नेते बालाजी पाटील-चाकूरकर यांनी दिली.
संघटनेचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी इशारा देत सांगितले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतून १० लाख युवकांना रोजगार आणि त्यापैकी ५० टक्के म्हणजे ५ लाख युवकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
युवकांनी आतापर्यंत १९ आंदोलने करूनही सरकारने केवळ आश्वासने दिली, प्रत्यक्ष कृती केली नसल्याचा दावा करण्यात आला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान काढलेल्या लोटांगण मोर्चावर लाठीचार्ज झाल्याची घटनाही त्यांनी नमूद केली असून अनेक प्रशिक्षणार्थी जखमी झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, ५ जानेवारी २०२६ पासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २४ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री तथा आमदार भास्करराव जाधव यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराचा संघटनेने निषेध केला असल्याचे सांगण्यात आले.
संघटनेची भूमिका स्पष्ट करताना बालाजी पाटील चाकूरकर म्हणाले, “एक तर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या, अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका.”
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून सुमारे २५ हजार प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर एकत्र येऊन सायंकाळी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने बेरोजगार युवकांवरील अन्याय तात्काळ दूर करून कायमस्वरूपी रोजगाराबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis