
मुंबई, 02 मार्च (हिं.स.) - माजी खासदार, माजी कुलगुरू व थोर विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण, राजकारण व साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. वाघमारे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पाया रचण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मराठवाडा विशेषतः लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लातूर पॅटर्न आणून एक शैक्षणिक क्रांती आणली आहे. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर सखोल लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली.
शिक्षण आणि साहित्य क्षेत्रासोबतच राजकारणातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. लातूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून लातूर शहराच्या विकासासाठी कार्य केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सरांचे शिक्षण क्षेञातील विचार व कार्य आणि समाजकारण- राजकारणातील नैतिक विचार व त्यासाठीचा आग्रह कायम स्मरणात राहिल. डॉ. जनार्दन वाघमारे सरांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक विश्वात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी