
-काश्मीरमध्ये इंटरनेटवर निर्बंध
नवी दिल्ली, 02 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून संभाव्य सांप्रदायिक तणावाबाबत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतातही परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता मंत्रालयाने व्यक्त केली आहे. विशेषतः धार्मिक सभा, सार्वजनिक कार्यक्रम किंवा भाषणांमध्ये परदेशातील घटनांचा उल्लेख झाल्यास वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २८ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. अशांतता पसरवू शकणाऱ्या व्यक्ती आणि गटांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः इराण समर्थक कट्टर प्रवचनकारांकडून भडकाऊ भाषणे होऊ शकतात, ज्यामुळे सांप्रदायिक भावना भडकण्याची शक्यता आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.
केंद्राने गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. संभाव्य तणावाच्या परिस्थितीत त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. खाडी देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्य करत असल्याने केंद्र सरकारने संयम बाळगण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकार भू-राजकीय घडामोडींसह त्याच्या देशांतर्गत परिणामांचाही आढावा घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर मधील काही भागांत आधीच खबरदारीचे उपाय लागू करण्यात आले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येच्या वृत्तानंतर काश्मीर खोऱ्यात अचानक निदर्शने सुरू झाली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेटचा वेग कमी करण्यात आला आहे. हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
श्रीनगरमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख भाग लाल चौक येथे घंटाघर परिसर बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांची तैनाती करण्यात आली आहे. सैदा कदल, बडगाम, बांदीपोरा, अनंतनाग आणि पुलवामा या भागांतूनही निदर्शनांचे वृत समोर आली आहेत.
तेहरानमध्ये संयुक्त अमेरिका-इस्रायल कारवाईदरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यात खामेनेई ठार झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर काही भागांत शोकसभा आणि निदर्शने आयोजित करण्यात आली. काश्मीरमध्ये अंदाजे १५ लाख शिया लोकसंख्या असून, या घटनेनंतर सर्वाधिक गर्दी याच समुदायाकडून झाल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.
पश्चिम आशियातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना त्याचे पडसाद भारतात उमटू नयेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सज्ज झाली आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule