
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)कुडल-संगम (ता. दक्षिण सोलापूर) येथील संगमेश्वर मंदिरात अनेक वर्षांपासून धूळखात पडलेल्या हेळ्ळे कन्नड भाषेतील शिलालेखाचे पुरातत्त्व विभागाने संवर्धन केले आहे. एसएस पद्धतीच्या पीन बसवून उभा करण्यात आला आहे.कुडल-संगम येथील प्राचीन संगमेश्वर मंदिराचा पुरातत्त्व विभागाकडून जीर्णोद्धार सुरू आहे. या मंदिराच्या आवारात दुर्लक्षित अवस्थेत एक कन्नड शिलालेख पडून होता. हा शिलालेख एकाच दगडावर दोन वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजाने कोरलेला होता. ही अखंड शीळा जमिनीवर पडून तुटलेल्या अवस्थेत पडून होती. या ऐतिहासिक अभिलेखास पुरातत्त्व विभागाने जतन संवर्धनाच्या प्रक्रियेतून नव्याने उभे केले आहे. तुटलेल्या दोन भागांना एसएस पिनद्वारे सुरक्षितपणे जोडून संरचनात्मक मजबुती देण्यात आली आणि नंतर तो मंदिराच्या भिंतीलगत उभा बसविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड