
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरूपदाच्या शर्यतीत घाटी रुग्णालयातील तीन डॉक्टर्स आहेत. यात अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, क्ष - किरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर, येथील प्राध्यापक व नाशिक येथील अधिष्ठातापदाची धुरा सांभाळणारे डॉ. व्यंकट गीते यांचा समावेश आहे. याबरोबरच घाटीचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या नावाचाही समावेश आहे.
कुलगुरूपदासाठी प्राप्त अर्जापैकी ३८ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. १३ व १४ मार्चला मुंबई येथे मुलाखती होणार आहेत.
उमेदवारांनी पात्रतेविषयी व विद्यापीठाच्या भावी दृष्टिकोनाविषयी प्रत्येकी दोन पानी लेखन सादर करावे लागणार आहे. तसेच तीन संदर्भपत्रांसह १० मिनिटांचे सादरीकरण करावे लागणार आहे. या मुलाखतीतून आधी पाचजणांची नावे निवडली जातील. त्यानंतर अंतिम निवड होईल.
राज्यभरातील अधिष्ठाता, विभागप्रमुखातून कुणाची वर्णी कुलगुरूपदी लागते, याकडे संबंधित वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निश्चित वेळेनुसार प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक असून, उशिरा येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस परवानगी दिली जाणार नाही. मुलाखतीचे स्थळ स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शिफारसपत्र आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis