
-सालवड-पास्थळ परिसरात खबरदारीचा इशारा
पालघर, 02 मार्च (हिं.स.)। पालघर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील ओ-झोनमध्ये सालवड व पास्थळ गावांच्या जवळ असलेल्या भागेरिया केमिकल्स (पूर्वी झेनिथ) या रासायनिक कंपनीत दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ओलियम वायू गळतीची घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सालवड व पास्थळ गावांतील नागरिकांना काय करावे व काय करू नये याबाबत सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गळती नियंत्रित करण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून हवेची गुणवत्ता तपासणी सुरू आहे. प्रभावित नागरिकांची वैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील घडामोडींबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी सांगितले.
(ओलियम वायू गळती : करावयाच्या गोष्टी...)
– तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा; वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने परिसरापासून दूर रहा.
– नाक-तोंड ओला रुमाल, कापड किंवा मास्कने झाका.
– उपलब्ध असल्यास हातमोजे, गॉगल, मास्क व पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा.
(टाळावयाच्या गोष्टी...)
– घाबरू नका; गोंधळामुळे अपघात होऊ शकतो.
– गळती झालेल्या रसायनाला स्पर्श करू नका.
– गळतीच्या ठिकाणी जाऊ नका व वायूचा श्वास घेऊ नका.
– गळतीवर थेट पाणी टाकू नका; रासायनिक प्रतिक्रिया होऊन धूर वाढू शकतो.
– प्रशासनाची परवानगी मिळेपर्यंत परिसरात परत जाऊ नका.
– दूषित अन्न किंवा पाणी वापरू नका.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL