बोईसर एमआयडीसीत ओलिअम वायू गळती
पालघर, 02 मार्च (हिं.स.)। बोईसर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक डी-१७ येथे असलेल्या भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सोमवारी (२ मार्च) दुपारी ओलिअम रसायनाची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. या गळतीमुळे हवेत सल्फर ट्रायऑक्साइड वायूचे
बोईसर एमआयडीसीत ओलिअम वायू गळती; चार नागरिकांना त्रास, परिस्थिती नियंत्रणात


पालघर, 02 मार्च (हिं.स.)। बोईसर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक डी-१७ येथे असलेल्या भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सोमवारी (२ मार्च) दुपारी ओलिअम रसायनाची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. या गळतीमुळे हवेत सल्फर ट्रायऑक्साइड वायूचे दाट धुके पसरले असून सुमारे एक किलोमीटर परिसरात दृश्यमानता कमी झाली होती. सुदैवाने, प्रशासन व आपत्कालीन पथकांच्या तत्परतेमुळे संध्याकाळपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर एमआयडीसीतील या कारखान्यात दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६५ टक्के ओलिअम रसायनाची गळती झाली. ही गळती दोन केएल क्षमतेच्या डे टँकच्या लेव्हल इंडिकेटर ग्लासमधून सुरू झाली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेली गळती काही वेळातच वाढल्याने परिसरात दाट धूर पसरला.गळती रोखण्यासाठी जमिनीवर सांडलेल्या ओलिअमवर तातडीने वाळू टाकून ते झाकण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस दल तसेच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था राखली.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ पथकाने स्वयंपूर्ण श्वसन संच (SCBA) वापरून दुपारी ३.४० वाजता प्रत्यक्ष गळती रोखण्याचे काम सुरू केले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आणि अथक प्रयत्नांमुळे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली.घटनेच्या वेळी कारखान्यात कार्यरत असलेले सर्व १५८ कामगार सुरक्षित असून त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही. मात्र, वायूच्या संपर्कामुळे रस्त्यावरून जाणारे तनू मिश्रा, हरिश्चंद्र मोवळे, भाविका मोरे आणि महेश माळी या चार नागरिकांना त्रास झाला. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande