पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची चिंता; संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन
नवी दिल्ली , 02 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “जगभर तणावाचे वातावरण आहे.
पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची चिंता; संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन


नवी दिल्ली , 02 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, “जगभर तणावाचे वातावरण आहे. भारत शांतता आणि स्थैर्याचा समर्थक असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत मिळून काम करेल. या संकटाचा तोडगा संवाद आणि राजनैतिक मार्गानेच निघावा, यासाठी भारताचा आग्रह आहे.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. भारत सर्व वाद संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून सोडवण्याचे समर्थन करतो. या प्रदेशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही संबंधित सर्व देशांसोबत समन्वय ठेवून काम करत राहू.”

यापूर्वी सोमवारी मध्यरात्री पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधून सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसेच “शत्रुत्व लवकरात लवकर थांबवण्याची गरज” त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

सध्याच्या संकटावर तोडगा केवळ चर्चा आणि राजनैतिक प्रयत्नांद्वारेच शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत नेहमीच शांतता, स्थैर्य आणि संवादाचा समर्थक राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षामुळे प्रादेशिक अस्थिरता वाढते आणि त्याचा परिणाम जागतिक स्तरावर होऊ शकतो, असे सांगत सर्व संबंधित पक्षांनी संयम राखून पुन्हा चर्चेच्या टेबलावर यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा ही भारत सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून गरज भासल्यास सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्व संबंधित देशांच्या संपर्कात असून सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले की, खाडी देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे सज्ज आहे आणि यासंदर्भात परदेशातील भारतीय दूतावासांशी सतत संपर्क ठेवला जात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रभावित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी संबंधित दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जोशी म्हणाले, “जगात कुठेही कन्नडिगा किंवा इतर भारतीय नागरिक संकटात सापडले तर केंद्र सरकार त्यांच्या सुरक्षित परतीची हमी देते. यापूर्वीही आम्ही युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणले होते. जगात कुठेही भारतीय असतील, त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.”

चिंताग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देताना त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आणि सर्व भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. युद्धग्रस्त भागांमध्ये सध्या हवाई प्रवास धोकादायक असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande