
किशोर पुराणिक यांना दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक
परभणी, 02 मार्च (हिं.स.)।
रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम दारवेकर स्मृती अभिवाचन स्पर्धेच्या अंतिम फेरीत परभणीच्या ‘संवाद संगीतांजली’ या नाट्य अभिवाचनाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची नोंद झाली आहे.
परभणी येथील राजीव गांधी युवा फोरम या संस्थेचे रविशंकर झिंगरे लिखित ‘संवाद संगीतांजली’ हे अभिवाचन सर्वोत्कृष्ट ठरले. या अभिवाचनाचे दिग्दर्शन करणारे किशोर पुराणिक यांना दिग्दर्शनासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. स्वरसाज श्रीकांत देशपांडे यांनी साकारला, तर निर्मितीची जबाबदारी संजय पांडे यांनी सांभाळली होती.
स्पर्धेची अंतिम फेरी दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी साने गुरुजी सभागृह, चाळीसगाव येथे पार पडली. प्रतिवर्षी दोन टप्प्यांत होणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रातील २० केंद्रांवर घेण्यात आली होती. तसेच महाराष्ट्राबाहेरील काही मराठी संघांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता.
प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या २७ संघांनी अंतिम फेरीत आपली कला सादर केली. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या स्पर्धेमुळे महाराष्ट्रासह राज्याबाहेर आणि देशाबाहेरही मराठी अभिवाचन चळवळीला चालना मिळत आहे. दरवर्षी विविध विषयांवर आणि साहित्यप्रकारांवर आधारित स्पर्धा हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरते.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री देसाई (पुणे), इरफान मुजावर (सांगली) आणि डॉ. हेमंत कुलकर्णी (जळगाव) यांनी काम पाहिले. आयोजनाची सूत्रे डॉ. मुकुंद करंबेळकर, श्री अडावदकर, दिव्या अहिरराव आणि रंगगंध कलासक्त न्यासच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हाताळली.
परभणीच्या संघाने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis