
पुणे, 02 मार्च (हिं.स.)वाकडमधील कस्पटे वस्ती ते बालेवाडीला जोडणाऱ्या कस्पटे वस्तीजवळील नदीवरील पुलाचे काम पूर्ण होऊनही सेवा रस्त्यांअभावी पुलाचा वापर होत नव्हता. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे स्वागत करत संबंधित जमिनीचे तातडीने अधिग्रहण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या.
बालेवाडी व वाकड या दोन उपनगरांना जोडणाऱ्या कस्पटे वस्ती चौकाजवळील नदीवर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, बालेवाडीच्या बाजूला संबंधित पुलास जोडणाऱ्या व पुढे मुख्य रस्त्याला लागणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासंदर्भात नोकरदार, रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु