
पुणे, 02 मार्च (हिं.स.)। गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या रस्त्यावर उड्डाणपूल तसेच मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. वाहनचालक तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. बाणेर, बालेवाडी यासह हिंजवडी आयटी पार्क कडे जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्याचा वापर नागरिकांकडून केला जातो. हिंजवडी येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र या रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येमुळे नोकरदार हैराण झाले आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थाकडे जाण्यासाठी देखील गणेशखिंड रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्यावरील आनंदऋषीजी चौकात (पुणे विद्यापीठ चौक) येथे काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला उड्डाणपूल पाडून टाकण्यात आला असून येथे नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. तसेच या रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम देखील गेल्या काही वर्षापासून सुरु असल्याचे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना सुरू करण्यात आले आहेत. काही चौकातील यू टर्न बंद करण्यात आले असून याचा फायदा वाहतूक सुरळीत होण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु