
लातूर, 02 मार्च (हिं.स.)गेल्या आठवड्यात अचानकपणे गारपिटीसह जोरदार वादळवारा आणि अवकाळी पाऊस होऊन रब्बी पिकाचे आणि फळबागायचे मोठे नुकसान झाले वीजपुरवठा खंडित झाल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या याबाबत लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी आढावा घेऊन नुकसानीचे सर्वच पंचनामे करावे त्याचबरोबर शासनाच्या कोणत्याही योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
रेणापूर येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, गट विकास अधिकारी सुमित जाधव, सा.बा. रेणापूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण देवकर, तालुका कृषी अधिकारी कांबळे, वीज वितरण कंपनीचे आळगे, रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अवकाळी पावसाने तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पिकांचे आणि काही संपत्तीचे नुकसान झाले आहे त्यात इट्टी, नागापूर, खानापूर, डि. देशमुख, मोटेगाव, भोकरंबा, पोहेरेगाव या भागात जास्त नुकसान झाले असून भोकरंबा, डि. देशमुख येथे काही लोकांचे घरावरील पत्रे उडाले. भोकरंबा येथे अंगणवाडी इमारतीची पडझड झालेली आहे. सूचनानुसार कारवाई पूर्ण झालेली आहे. पंचनामे केले आहेत. लवकरच याबाबत निधी सुद्धा उपलब्ध होईल अशी माहिती बैठकीत अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली. तर पशुधन चोरीचे वाढते प्रमाण, अवैध धंदे, शेतकरी सन्मान, लाडकी बहीण, घरकुल योजना, शेतकऱ्याच्या राशनचे पैसे, शेत रस्त्याच्या अडचणी या सर्व विविध अडीअडचणी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागेसह रब्बीच्या नुकसानीत आलेल्या सर्व पिकाचे पंचनामे करावेत, तारा तुटून व इतर कारणाने खंडित झालेला शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा असे सांगून यावेळी बैठकीत बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, लाडकी बहीण, घरकुल योजना, शेतकरी सन्मान योजना यासह शासकीय योजनेतील गरजू लाभार्थ्यांच्या त्रुटी दूर करून एकही लाभार्थी लाभार्थी वंचित राहणार नाही याची संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या.
रेणापूर तालुक्यात अवैध दारू विक्री, जुगार, मटका यासारखे कुठेही अवैध धंदे चालता कामा नये तात्काळ संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करावी वाढते चोरीचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य ते उपाययोजना करावी असे सांगून सर्वसामान्य माणसांना शासन आपल्या हक्काचे आहे दिलासा देणारे आहे याची जाणीव आपल्या तत्पर कामातून अधिकाऱ्यांनी दाखवावी असेही आव्हान आ. रमेशआप्पा कराड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis