एसबीएल कंपनी स्फोट : मृतांचा आकडा 19 वर; कामगार सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नागपूर, 02 मार्च (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत रविवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शास
एसबीएल एनर्जी लि. कंपनी लोगो


नागपूर, 02 मार्च (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत रविवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी खाणी, खनन आणि औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारची विस्फोटके तयार करते. स्लरी एक्सप्लोसिव्ह्ज, इमल्शन एक्सप्लोसिव्ह्ज, बुल्क विस्फोटके, डेटोनेटर, डेटोनेटिंग फ्युज आणि कम कॉलम चार्ज विस्फोटके आदी उत्पादनात कंपनी कार्यरत आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनी महाराष्ट्रात नोंदणीकृत असून तिचे मुख्यालय नागपूर शहरात आहे. कंपनीचा नोंदणी क्रमांक U24292MH2002PLC134851 असा आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अधिकृत व्यक्ती म्हणून आलोक चौधरी यांचे नाव नोंद आहे.कंपनीची स्थापना 2002 साली ‘अमिन एक्सप्लोसिव्हज प्रा. लि.’ या नावाने झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये चौधरी कुटुंबाने कंपनीचे अधिग्रहण करून तिचे नाव बदलल्याचे आर्थिक अहवालांमधून समोर आलेय.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बारूद व स्फोटक उत्पादक कारखान्यांना परवाने देणे, सुरक्षिततेचे निरीक्षण करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी “पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन” (पेसो) यांच्याकडे असून पेसोचे मुख्यालयही नागपूरमध्येच आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या विस्फोटक कारखान्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट, जीवितहानी आणि जखमींची वाढती संख्या यामुळे पेसोच्या निरीक्षण प्रक्रियेवर आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande