
पालघर, 02 मार्च (हिं.स.)।होळी हा रंग, आनंद आणि बंधुभावाचा सण असून तो सुरक्षित आणि शांततेत साजरा व्हावा, असे आवाहन सफाळे पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रेम, एकता आणि सामाजिक सलोखा जपत उत्सव साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रासायनिक रंगांचा वापर टाळून सुरक्षित व नैसर्गिक रंगांचा वापर करावा. पाण्याची बचत करत कोरडी होळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावे. मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. जबरदस्तीने रंग लावणे, हुडदंग करणे टाळून सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सहकार्यामुळेच होळी सण आनंददायी आणि सुरक्षित होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत सफाळे पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ 112 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL