
लातूर, 02 मार्च (हिं.स.)।
ज्येष्ठ विचारवंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, प्रगल्भ शिक्षणतज्ज्ञ तसेच राज्यसभेचे माजी खासदार आदरणीय डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक बहुआयामी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. वाघमारे हे खऱ्या अर्थाने ज्ञान, विचार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि प्रगतिशील विचारांची मांडणी सातत्याने केली. लातूर जिल्ह्यातील कवठा सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास राज्यसभेपर्यंत तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचला. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी लातूर जिल्ह्याचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव वाढविला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय पायाभरणीत मोलाचे योगदान दिले. तसेच लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य करताना त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोन आणि सामाजिक जाणीव असलेली पिढी घडविण्याचे कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील.
साहित्य क्षेत्रातही त्यांनी विपुल लेखन करून वैचारिक समृद्धी वाढविली. विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी साहित्य चळवळीला नवी दिशा व विचार दिले. अभ्यासू लेखक, प्रभावी वक्ते आणि संवेदनशील चिंतक म्हणून त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली होती.
लातूर शहराचे थेट जनतेतून निवडून आलेले लोकनिर्वाचित पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी दूरदृष्टीने कार्य केले. प्रशासनातील पारदर्शकता, लोकसहभाग आणि विकासाभिमुख धोरणांमुळे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर आदर्श निर्माण केला. सार्वजनिक जीवनात तत्त्वनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची भूमिका त्यांनी अखेरपर्यंत जपली.
त्यांच्या निधनाने एक तत्त्वनिष्ठ मार्गदर्शक, अभ्यासू नेतृत्व आणि समाजाला दिशा देणारा विचारवंत आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. दिवंगत डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— शिवेंद्रसिंहराजे भोसले
पालकमंत्री, लातूर जिल्हा
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis