कोल्हापूर येथे आगामी जनगणनेच्या तयारीचा आढावा
माहितीच्या अचूकतेवर डॉ. निरुपमा डांगे यांचा भर कोल्हापूर, 02 मार्च (हिं.स.) : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाच्या ध्येयधोरणे आणि विकासनियोजनाचा पाया ठरणार असल्याने माहितीची गुणवत्ता व सत्यता अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्
राज्य जनगणना आढावा


माहितीच्या अचूकतेवर डॉ. निरुपमा डांगे यांचा भर

कोल्हापूर, 02 मार्च (हिं.स.) : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाच्या ध्येयधोरणे आणि विकासनियोजनाचा पाया ठरणार असल्याने माहितीची गुणवत्ता व सत्यता अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ‘जिल्हा जनगणना कार्यालयाचे’ उद्घाटन डॉ. डांगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मुख्य बैठकीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी तथा प्रमुख जिल्हा जनगणना अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव, उपसंचालक जनगणना प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज ऑफिसर, तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉ. डांगे यांचे स्वागत पर्यटन पुस्तिका व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिकृती देऊन केले.

तांत्रिक रचना व प्रशिक्षणावर भर

डॉ. डांगे यांनी जनगणनेच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करताना प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. माहिती संकलन करताना कोणताही भाग सुटणार नाही किंवा माहितीची पुनरावृत्ती होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जनगणना कक्षासाठी पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून या राष्ट्रीय कार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

गगनबावडा तालुक्यात प्री-टेस्ट पूर्ण

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या तयारीचे सादरीकरण करताना सांगितले की, गगनबावडा तालुका येथील ४५ गावांची ‘प्री-टेस्ट’ (पूर्व-चाचणी) साठी निवड करण्यात आली होती आणि तेथील प्रायोगिक काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. महापालिका क्षेत्रातील तयारीबाबतही संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती सादर केली.

बैठकीच्या शेवटी डॉ. डांगे यांनी कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असल्याचे नमूद करत सर्वांनी समन्वयाने अचूक व पारदर्शक काम करण्याचे आवाहन केले. उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांनी आगामी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

-----------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande