रायगड- भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
रायगड, 02 मार्च (हिं.स.)मुंबई–गोवा महामार्गावर आमटेम ब्रिजपुढे भरधाव दुचाकीच्या धडकेत 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना 1 मार्च 2026 रोजी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास वडखळ पोलीस ठाणे हद्दीत घडली. मिळालेल्या मा
vadkhal


रायगड, 02 मार्च (हिं.स.)मुंबई–गोवा महामार्गावर आमटेम ब्रिजपुढे भरधाव दुचाकीच्या धडकेत 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना 1 मार्च 2026 रोजी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास वडखळ पोलीस ठाणे हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आमटेम गावाच्या हद्दीत, नागोठणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर दुचाकी (क्र. एमएच 09 एचबी 4998) चालकाने अतिवेगात आणि बेदरकारपणे वाहन चालवित असताना रस्ता ओलांडत असलेल्या निर्मला गजानन तांबोळी (वय 53, रा. आमटेम, ता. पेण) यांना समोरून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघातात त्यांच्या डोक्यास व डाव्या कुशीत गंभीर मार लागला. तसेच डाव्या हाताच्या कोपर्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे आमटेम परिसरात संताप आणि शोककळा पसरली आहे. महामार्गावरील वाढता वेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. संबंधित दुचाकी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुरनं. 13/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 106(A), 281, 125(A), 125(B) तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस पाटील करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande