
* 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन'चा मुंबईत मदतीचा हात!
मुंबई, 02 मार्च (हिं.स.) - बालकल्याण आणि मानवतावादी सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. थॅलेसेमिया आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या मुलांसाठी संस्थेने 'होम फॉर बोन मॅरो ट्रान्सप्लांट' या विशेष केंद्राची स्थापना केली आहे. हे केंद्र केवळ निवारा नसून, रुग्णालयाच्या भिंतीबाहेरही मुलांच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या मानसिक धैर्याची काळजी घेणारे एक सुरक्षित ठिकाण ठरत आहे.
चाइल्ड हेल्प फाऊंडेशनने आजवर ४,२२६ पेक्षा जास्त बालकांना जीवघेण्या आजारांतून बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या दीर्घकालीन आणि खर्चिक उपचार प्रक्रियेत कुटुंबांना अनेक अदृश्य आव्हानांचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून 'होम फॉर बीएमटी'च्या माध्यमातून राहण्याची सोय, पौष्टिक आहार, प्रवासासाठी मदत आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. यामुळे उपचार कालावधीत मुलांचे शिक्षण खंडित न होता त्यांना एक सामान्य जीवन जगल्याची जाणीव होते.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन'चे कार्यकारी संचालक जिजी जॉन म्हणाले की, होम फॉर बीएमटीची निर्मिती ही केवळ वैद्यकीय मदत नसून ती मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भावनिक आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे. महागडे उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांवरील ओझे कमी करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. सुरक्षित निवारा आणि इतर मूलभूत सुविधा मिळाल्यामुळे पालक आपले संपूर्ण लक्ष मुलांच्या प्रकृतीवर केंद्रित करू शकतात.
संस्थेचा असा विश्वास आहे की, उपचार केवळ औषधांनी होत नाहीत, तर त्यासाठी पोषक वातावरण आणि आश्वासक आधाराची गरज असते. नियमित आहार, राहण्याची स्थिर जागा आणि सातत्यपूर्ण शिक्षण या गोष्टींमुळे मुलांमध्ये आत्मसन्मानाने जगण्याची जिद्द निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीतही पालकांना आशेचा किरण दाखवणारे हे केंद्र समाजासाठी एक मोठे योगदान ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी