गावच भारी; जावयाची काढतात गदर्भ (गाढव) सवारी
बीड, 02 मार्च (हिं.स.)। लग्नाच्या वरातीमध्ये घोडा किंवा अन्य मान- पान नसेल तर जावई रुसल्याची उदाहरणे असतात. पण, विडा (ता. केज, जि. बीड) गावचे जावई मात्र हसत हसत गाढवावर बसतात. धुलीवंदनाच्या दिवशी गावातील कोण्याही एका जावयाची गदर्भसवारीची परंपरा ये
अ


बीड, 02 मार्च (हिं.स.)।

लग्नाच्या वरातीमध्ये घोडा किंवा अन्य मान- पान नसेल तर जावई रुसल्याची उदाहरणे असतात. पण, विडा (ता. केज, जि. बीड) गावचे जावई मात्र हसत हसत गाढवावर बसतात. धुलीवंदनाच्या दिवशी गावातील कोण्याही एका जावयाची गदर्भसवारीची परंपरा येथे शंभर वर्षांहून अधिक काळापासून आहे. गाढवाला चपलांची माळ, वर ऐटीत जावई आणि रंग, गुलालाची उधळण, ढोल ताशा अन डॉल्बीचा गजर करत समोर नाचणारे हजारो तरुणांसह अबालवृद्ध अशा जल्लोषात निघालेल्या मिरवणूकीवर घराच्या छतावरुन महीला रंगाची उधळण करतात. गावाच्या पालखी रस्त्यावरुन मिरवणूक पूर्ण होऊन ग्रामदैवत राजा हनुमान मंदिरासमोर मिरवणूकीच्या समारोपानंतर जावयाला गावकऱ्यांच्या वर्गणीतून मनपसंत कपड्यांचा आहेर केला जातो. एखाद्याला सासऱ्यांच्या ऐपतीप्रमाणे सोन्याची अंगठीही आहेरात मिळते. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात कोविड संसर्गाचा काळ आणि मागच्या वर्षी परिसरातीलच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दुर्दैवी प्रकरण हे अपवाद सोडता परंपरेला खंड पडलेला नाही.

विडा हे निजाम कालीन जहागिरदारीचे गाव असून तत्कालिन जहागिरदार दिवंगत ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली येथील मेहुणे १९१५ साली ऐन धुलीवंदनाच्या दिवशी विडा येथे आले. त्यावेळी मस्करीत त्यांची गावकऱ्यांनी गदर्भसवारी काढल्याचे ठाकूर समिरसिंह देशमुख यांनी सांगीतले. पुढे गावात ही परंपराच बनली.

या गदर्भ सवारीचा मान गावातील सर्वच जाती, धर्म आणि घटकांच्या जावयांना मिळाला. मात्र, यावरुन कधी कुरबरीचाही प्रकार घडला नाही, असे सरपंच सुरज पटाईत यांनी 'सकाळ'ला सांगीतले. यातूनच गावातील सामाजिक एकोपा सहज लक्षात येतो.

नोकरी, व्यवसाय, घरजावई आणि गावातीलच मुलगी केलेले अशा जावयांची संख्या दोनशेंवर आहे. पण, धुलीवंदन जवळ येताच ही मंडळी पोबारा करते. त्यामुळे गावातील तरुण होळीच्या दिवशीपासून जावयांचा शोध घेत या गावाहून त्या गावांना फिरतात. एकदा हाती लागलेला जावई सुरुवातीला 'ना नु' करतो आणि मग हसत सर्वांसोबत येतो. शक्यतो आदल्या दिवशीच जावई पकडून ठेवला जातो. यंदाही या कामात तरुण गुंतले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande