
लातूर, 02 मार्च (हिं.स.) - माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे आज, सोमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू व वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतभर ओळख असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून डॉ. वाघमारे सर ओळखले जातात. डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा, ता. औसा, जि. लातूर येथे उद्या, मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. वाघमारे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. त्यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली. डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली.
लातूर नगरीचे पहिले 'लोकनियुक्त नगराध्यक्ष' म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून कार्य करताना स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधा यांवर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या पुढाकारामुळे लातूरला स्वच्छतेच्या मोहिमेत राज्यस्तरीय सन्मानही मिळाला होता. त्यांची संसदीय कारकीर्दही कौतुकास्पद आहे. पुरोगामी विचारांवर त्यांची पकड होती. शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतभर ओळख असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून डॉ. वाघमारे सर ओळखले जातात. स्पर्धात्मक व निकालाभिमुख अभ्यासपद्धती, शिस्तबद्ध अध्ययन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली. आज देशभरात ज्याचा उल्लेख आदराने केला जातो, त्या लातूर पॅटर्नचा प्रारंभीचा पाया डॉ. जे. एम. वाघमारे यांनी घातला.
शिक्षण, कृषि, साहित्य, कला आणि राजकारण व समाजकारण यांसारख्या क्षेत्रात डॉ. वाघमारे यांचा मुक्त संचार होता. त्यावर आधारित अनेक ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली; समाजप्रबोधन केले. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी अनेकदा त्यांनी परदेश दौरे केले, शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणले. डॉ. वाघमारे यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू आणि लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च स्थान मिळवून देणारे लातूर पॅटर्न शैलीचे शिल्पकार आणि मराठवाडा एज्यूकेशन कोन्क्लेव्ह २०२५ चे मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख अजरामर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis