
पुणे, 02 मार्च (हिं.स.)। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दक्ष झाले आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘पुणे शहरात आखाती देशातील विशेषत: इराणमधील विद्यार्थी वास्तव्यास आहेत. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांकडून इराणमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. इराणी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्था चालकांच्या संपर्कात पोलीस आहेत’, अशी माहिती विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. ‘संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (क्रमांक- ११२) किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा’, असे आवाहन करण्यात आले आहे. व्हिसाची मुदत संपत असल्यास इराणी विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु