
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होऊन पंधरा दिवस लोटले तरी अद्याप अध्यक्ष व सभापती निवडणुकीबाबत शासनाकडून अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे अध्यक्ष व सभापती कोण होणार या चर्चेबरोबर आता स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणली भाजपच्या 68 जागापैकी 38 सदस्य भाजपचे निवडून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे निर्विवाद सत्ता आली. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या चर्चेनंतर आता एक मोठी लक्षवेधी ठरत आहे ती म्हणजे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य पदी कोणाची वर्णी लागणार. यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पॅटर्न चर्चेचा ठरला आहे. निवडणुकीत नाराज झालेल्या इच्छुकांना स्वीकृत करण्याचा शब्द दिला होता. आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नव्हते. पण यावेळेस प्रथमच स्वीकृतची संधी मिळणार आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पॅटर्न तयार केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य निवडीसाठीचा प्रस्ताव त्यांनी तयार करून मंजुरीसाठी मंत्रालयाकडे सादर केल्याचे समजते. या प्रस्तावाची फाईल सध्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे. त्यांची सही झाल्यावर याबाबत अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळेच पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम लांबल्याची चर्चा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड