
पुणे, 02 मार्च (हिं.स.)काळी, हिरवी आणि लाल टपोऱ्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सोमवारी आरास करण्यात आली. मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु