
नवी दिल्ली, 02 मार्च (हिं.स.)। भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. बाजार उघडल्यानंतर अवघ्या पहिल्या पाच सेकंदांत बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल ७.८० लाख कोटी रुपयांची घट झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला विक्रीचा जोर वाढल्याने निर्देशांकांवर तीव्र दबाव दिसून आला.
बीएसईचा सेन्सेक्स २,७४३.४६ अंकांनी घसरत ७८,५४३.७३ वर उघडला. मात्र, त्यानंतर काही काळ खरेदीचा ओघ वाढल्याने निर्देशांकाने झपाट्याने सावरत पहिल्या २० मिनिटांत ८०,६३२.५५ पर्यंत मजल मारली. तरीही ही तेजी टिकू शकली नाही. विक्रीचा दबाव पुन्हा वाढल्याने सकाळी १०:१५ वाजता सेन्सेक्स १,०३७.५५ अंकांनी घसरलेला दिसून आला.
एनएसईचा निफ्टीही सुरुवातीला ५१९.४० अंकांनी घसरून २४,६५९.२५ वर उघडला. प्रारंभी खरेदी वाढल्याने तो २४,९८९.३५ पर्यंत गेला; परंतु नंतरच्या सत्रात पुन्हा घसरण दिसली. सकाळी १०:१५ वाजता निफ्टी ३१५.१० अंकांच्या तोट्यासह २४,८६३.५५ वर व्यवहार करत होता.
व्यवहाराच्या पहिल्या तासात भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू स्टील यांसारख्या काही प्रमुख समभागांमध्ये वाढ दिसली. उलट, लार्सन अँड टुब्रो, इंटरग्लोब एव्हिएशन, एशियन पेंट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स या समभागांवर विक्रीचा मोठा दबाव राहिला.
एकूण २,७९९ समभागांपैकी केवळ ४७० समभाग वाढीसह व्यवहार करत होते, तर २,३२९ समभाग घसरणीत होते. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग लाल निशाणीत होते, तर निफ्टीतील ५० पैकी ४३ समभाग तोट्यात व्यवहार करत होते. गेल्या शुक्रवारीही बाजारात घसरण झाली होती. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule