खेळाडूंना पाकिस्तानला पाठवण्यापूर्वी सरकारी परवानगी अनिवार्य — बांगलादेश क्रिकेट बोर्ड
ढाका, 20 मार्च (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) स्पष्ट केले आहे की
खेळाडूंना पाकिस्तानला पाठवण्यापूर्वी सरकारी परवानगी अनिवार्य — बांगलादेश क्रिकेट बोर्ड


ढाका, 20 मार्च (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) स्पष्ट केले आहे की आता खेळाडूंना पाकिस्तानात पाठवण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्यात येईल. खेळाडूंना यापूर्वी एनओसी देण्यात आले असले तरी सध्याच्या परिस्थितीमुळे स्थितीत बदल झाला आहे.

बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्स चेअरमन नजमुल आबेदीन यांनी स्पष्ट केले की सध्याची परिस्थिती सामान्य नाही. ते म्हणाले, “आम्ही आमच्या खेळाडूंना पीएसएलमध्ये पाठवण्यापूर्वी सरकारची परवानगी नक्की घेऊ. सामान्य परिस्थितीत याची गरज नसते, पण सध्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत धोका आहे.”ते पुढे म्हणाले, “तिथे जाणे सुरक्षित आहे की नाही, हे आम्ही सरकारकडून जाणून घेऊ. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल.”

नजमुल आबेदीन यांनी हेही स्पष्ट केले की बोर्ड स्वतः परिस्थितीचे पूर्ण मूल्यमापन करू शकत नाही. ते म्हणाले, “तिथली परिस्थिती समजून घेणे आमच्यासाठी सोपे नाही. सरकारच याचे अधिक चांगल्या प्रकारे मूल्यांकन करू शकते. सरकारने हिरवा कंदील दिल्यास खेळाडू जातील.” या वक्तव्यातून अंतिम निर्णय पूर्णपणे सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, या निर्णयाचा परिणाम एकूण सहा बांगलादेशी खेळाडूंवर होऊ शकतो. यामध्ये मुस्तफिजुर रहमान आणि परवेज हुसेन इमोन (लाहोर कलंदर्स) यांचा समावेश आहे. तसेच शोरिफुल इस्लाम, नाहिद राणा, तंजीद हसन तमीम आणि रिशाद हुसेन हे पेशावर झल्मी संघाचा भाग आहेत.

बांगलादेशी खेळाडूंनी पीएसएलमध्ये भाग घेतल्यास त्यांना न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या तयारीपासून दूर राहावे लागू शकते. मार्चच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे संतुलन राखण्यासाठी बोर्डाने अंशतः एनओसी जारी केले आहेत.

बीसीबीने खेळाडूंना पूर्ण मुभा देण्याऐवजी आंशिक एनओसी दिले आहे, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी उपलब्ध राहू शकतील. मुस्तफिजुर रहमान यांना २६ मार्च ते १२ एप्रिल आणि २४ एप्रिल ते ३ मेपर्यंत, तर तंजीद, शोरिफुल, राणा आणि रिशाद यांना १२ एप्रिलपर्यंत एनओसी देण्यात आले आहे. परवेज हुसेन यांना २१ एप्रिलपर्यंत परवानगी मिळाली आहे. यावरून बोर्ड पीएसएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

सध्या इतर विदेशी खेळाडूंनी अनुपलब्धता जाहीर केलेली नसली तरी बांगलादेशी खेळाडूंवरील अनिश्चितता पीएसएलसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. परिस्थिती आणखी बिघडल्यास इतर देशांतील खेळाडूही आपल्या सहभागाबाबत पुनर्विचार करू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande