
रायगड, 21 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत रहाटवडे परिसरात कपडे खरेदीसाठी निघालेल्या कुटुंबावर विनाकारण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या मुलगा व भाचीच्या मुलासह सुभाषनगर येथून पायी तांबडी मार्गे खोपोलीकडे जात होते. यावेळी रहाटवडे येथील गाईच्या गोठ्याजवळ दोन आरोपींनी त्यांना अडवले.
आरोपींनी कोणतेही कारण नसताना फिर्यादींच्या मुलाला “तुला खल्लास करून टाकेल” अशी धमकी दिली. याबाबत जाब विचारल्यावर आरोपींनी संतापून फिर्यादीवर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यामध्ये फिर्यादी जमिनीवर पडल्यावर आरोपींनी दगडाने त्यांच्या छातीवर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच एका आरोपीने फिर्यादींच्या चेहऱ्यावरही जोरदार मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 98/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1), 115(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दबडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)