
नांदेड, 21 मार्च (हिं.स.)
बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथे डी गँगच्या एका सदस्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले असून त्यांच्या जवळून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल, तीन मॅगझिन, १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बिलोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, नांदेड येथील डी गँगचा सदस्य असलेला एक जण बिलोली तालुक्यातील चिंचाळा बसस्थानक येथे येणार आहे. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन चिंचाळा बसस्थानक येथे सापळा रचला. त्यावेळी त्या ठिकाणी संशयास्पद फिरणाऱ्या एकास ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ दोन गावठी पिस्तूल, तीन मॅगझिन, १० काडतुसे असा ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी
केली असता तो नांदेड येथील डी गँगचा सदस्य असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांनी बिलोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार बिलोली पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी बडगू, बोधगिरे, वैद्य, राठोड, कदम यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis