
नाशिक, 21 मार्च (हिं.स.) : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय आणि प्रशासकीय घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाशिक पोलीस अधिक सक्रिय झाले असून त्यांना चौकशीसाठी कोणत्याही क्षणी नोटीस बजावली जाऊ शकते. चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या अटकेची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला “कॅप्टन” आणि राजकीय ज्योतिषी म्हणवणाऱ्या अशोक खरात याला नाशिक गुन्हेशाखा युनिट-1 ने बलात्कारासारख्या गंभीर आरोपांखाली बुधवारी (दि. 18) अटक केली. गेल्या 25 वर्षांपासून तो नाशिकसह विविध ठिकाणी प्रभावशाली व्यक्तींना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवणूक व शोषण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील माहिती उघड करणारा नीरज जाधव यालाही शुक्रवारी दुपारी नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये रूपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून विविध आरोप होत असतानाच चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांची भेट घेतली व त्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
पोलीस तपासात चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील संबंधांबाबत काही पुरावे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. आता नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्याची तयारी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV