पंजाबमध्ये वेअरहाउसिंग विभागातील जिल्हा व्यवस्थापकाची आत्महत्या; परिवहन मंत्र्यांचा राजीनामा
-अधिकाऱ्याने मृत्यूपूर्वी व्हिडिओ जारी करून मंत्र्यावर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश चंदीगड, 21 मार्च (हिं.स.)। पंजाबमधील अमृतसर येथे कार्यरत असलेल्या स्टेट वेअरहाउस कॉर्पोरेशनच्या जिल्हा व्यवस्थापकाच्या आत्महत्येच्या प्रकरणाने गंभीर
Punjab Transport Minister


-अधिकाऱ्याने मृत्यूपूर्वी व्हिडिओ जारी करून मंत्र्यावर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

चंदीगड, 21 मार्च (हिं.स.)। पंजाबमधील अमृतसर येथे कार्यरत असलेल्या स्टेट वेअरहाउस कॉर्पोरेशनच्या जिल्हा व्यवस्थापकाच्या आत्महत्येच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. शनिवारी संबंधित अधिकाऱ्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाबचे परिवहन मंत्री लालजीत भुल्लर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी मुख्य सचिवांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गगनदीप सिंह रंधावा अमृतसर आणि तरनतारन येथे सेवा बजावत होते. घटनेनंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी गगनदीप यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून परिवहन मंत्री लालजीत भुल्लर यांचे नाव घेत गंभीर आरोप केले.

मिळालेल्या माहितीनुसार, विभागाकडे एका गोदामासाठी जागा देण्याचा प्रस्ताव आला होता. तपासणीदरम्यान विभागीय पथकाला आढळले की प्रस्तावित जागेवरून उच्च दाबाच्या वीजवाहिन्या जात होत्या, ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ती जागा योग्य नव्हती. याच कारणास्तव हा प्रस्ताव विभागाने नाकारला होता.

शुक्रवारी अमृतसर दौऱ्यावर असताना मंत्री लालजीत भुल्लर यांनी या प्रकरणात जिल्हा व्यवस्थापकावर दबाव आणल्याचा आरोप आहे. या दबावामुळे मानसिक ताण वाढून गगनदीप सिंह रंधावा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी विष प्राशन करण्यापूर्वी संपूर्ण घटनेचा उल्लेख करणारा व्हिडिओ तयार केला होता.

या घटनेनंतर पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अकाली दलाचे नेते बिक्रमजीत मजीठिया यांनी मृत अधिकाऱ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह औजला यांनी रुग्णालयात भेट देऊन मृतदेहाचे पोस्टमार्टम पीजीआयच्या तज्ज्ञ समितीकडून करण्याची मागणी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री लालजीत भुल्लर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी मुख्य सचिवांना संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचदरम्यान, लालजीत भुल्लर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आपण स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी प्रक्रियेत मंत्रीपद अडथळा ठरू नये, तसेच सत्य लवकरच समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande