युद्धामुळे वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत 3 ते 10 टक्के वाढीची शक्यता
नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)। अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठे आर्थिक परिणाम दिसू लागले असून त्याचा थेट फटका भारतातील ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे केवळ इंधनाचे दरच वाढले नाहीत, तर प्लास्टिक आणि
Impact War Significant Rise  Prices of Electronic Goods


नवी दिल्ली, 21 मार्च (हिं.स.)। अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठे आर्थिक परिणाम दिसू लागले असून त्याचा थेट फटका भारतातील ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे केवळ इंधनाचे दरच वाढले नाहीत, तर प्लास्टिक आणि पॉलिमर यांसारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच वाढलेला वाहतूक खर्च आणि रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. परिणामी, एप्रिलपासून फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशीनसारख्या दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत तीन ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर वाहन उद्योगात सुमारे २ ते ३ टक्क्यांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मूझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून होणारी जागतिक व्यापाराची वाहतूक ठप्प झाल्याने सागरी मालवाहतुकीचा खर्च प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम म्हणून पॉलिप्रोपिलीन, स्टायरीन मोनोमर आणि एबीएस यांसारख्या पेट्रोकेमिकल पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. हे सर्व घटक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी रुपया घसरून एका डॉलरमागे ९३.७१ रुपयांवर पोहोचल्याने आयात खर्च आणखी वाढला आहे.

उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, वाढलेला खर्च कंपन्यांना पूर्णपणे सहन करणे शक्य नसल्यामुळे दरवाढ अपरिहार्य ठरत आहे. एअर कंडिशनरच्या किमतीत ३ ते ५ टक्के आणि वॉशिंग मशीनच्या किमतीत ८ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, तर फ्रिजच्या किमतीत ४ ते 5 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. विशेषतः वॉशिंग मशीनमध्ये प्लास्टिकचा वापर जास्त असल्याने त्यावर कच्च्या मालाच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम होणार आहे.

वाहन उद्योगात सुमारे २ ते ३ टक्क्यांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे. लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझ आणि ऑडी यांनी आधीच १ एप्रिलपासून सुमारे २ टक्क्यांची दरवाढ जाहीर केली आहे. इतर मोठ्या वाहन कंपन्याही दरवाढीचा अंतिम निर्णय घेत आहेत.

याशिवाय, पॉलिमर-आधारित साहित्य, केबल्स, इन्सुलेशन आणि पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तांब्याच्या किमतीतही मोठी उसळी आली असून चलनातील अस्थिरता आणि सागरी मालवाहतुकीच्या शुल्कात ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याने उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या अकरा दिवसांतच कच्च्या मालाच्या किमतीत तब्बल ५९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

गतवर्षी जीएसटी कपातीमुळे कमी झालेल्या किमती आता पुन्हा वाढण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसी, फ्रिज यांसारख्या उपकरणांची मागणी वाढत असताना दरवाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स बाजारात महागाईचा दबाव अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande