
दोहा, 22 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कतारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कतारच्या प्रादेशिक समुद्री हद्दीत रविवारी पहाटे हेलिकॉप्टर अपघात झाला असून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याची पुष्टी कतारच्या गृह मंत्रालयाने केली आहे.
ही दुर्घटना हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे झाली होती. पण गृह मंत्रालयाने या तांत्रिक बिघाडाचा तपशील उघड केलेला नाही. तसेच मरण पावणाऱ्यांमध्ये कोणत्या देशाचे नागरिक होते, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामध्ये कोणी सनदी अथवा लष्करी अधिकारी होते का हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कतारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण ७ प्रवासी असण्याची शक्यता आहे. सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून, एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी कतारचे नौदल आणि तटरक्षक दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
अपघातानंतर तटरक्षक दल आणि बचाव पथकांनी तातडीने काम सुरू केले, मात्र समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. उपलब्ध सर्व संसाधनांचा वापर करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत.
या दुर्घटनेची माहिती सर्वप्रथम कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिली होती. कतार सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. बचाव जहाजे, निगराणी उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी शोध क्षेत्रात कार्यरत असून बचावाची शक्यता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
समुद्रातील परिस्थिती बचाव कार्यात अडथळा ठरत असली तरी कतार सरकार हवामान आणि समुद्री परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, कारण याचा बचाव मोहिमेच्या सुरक्षिततेवर आणि गतीवर परिणाम होऊ शकतो. कतार सरकारने सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून शोध आणि बचाव कार्य सुरक्षित आणि प्रभावीपणे सुरू ठेवले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode