
जेरुसलेम , 22 मार्च (हिं.स.)। इराणने शनिवारी उशिरा रात्री इस्रायलमधील दोन शहरांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. दक्षिण इस्रायलमधील डिमोना शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ४७ जण जखमी झाले. तर दक्षिण इस्रायलमधील अराद शहरावर झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात ५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.या हल्ल्यांनंतर पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी आपत्कालीन मदत आणि बचाव पथकांना अधिक सक्षम करण्यात येत असल्याचे सांगितले.
इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, अरादमधील हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. नेतन्याहू म्हणाले, “आपल्या भविष्याच्या लढाईतील ही अत्यंत कठीण संध्याकाळ आहे. आम्ही आमच्या शत्रूंवर सर्व आघाड्यांवर कारवाई सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहोत.”
पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान इराणने प्रथमच इस्रायलच्या एका अणु प्रकल्पाला लक्ष्य केले आहे. इराणच्या नतांज अणु केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांत हा प्रतिहल्ला करण्यात आला. सध्या सुरू असलेला पश्चिम आशियातील संघर्ष चौथ्या आठवड्यात प्रवेश करत असताना परिस्थिती अधिक धोकादायक आणि नव्या टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.
इस्रायलमधील मोठे अणुऊर्जा केंद्र असलेले डिमोना शहर ‘लिटल इंडिया’ या नावानेही ओळखले जाते. या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बचाव पथकांच्या माहितीनुसार, जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, क्षेपणास्त्र एका सामुदायिक इमारतीवर पडल्यामुळे आसपासची जुनी घरेही नुकसानग्रस्त झाली. बहुतेक नागरिक सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये (शेल्टरमध्ये) असल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांच्या वृत्तानुसार, अरादमध्ये क्षेपणास्त्र थेट रोखण्यात आलेल्या अपयशाची चौकशी इस्रायली वायुसेनेने सुरू केली आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र रोखण्यासाठी केलेले दोन इंटरसेप्शन प्रयत्न अयशस्वी ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode