
वॉशिंग्टन , 22 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत म्हटले आहे की, पुढील ४८ तासांच्या आत होर्मुज सामुद्रधुनी कोणत्याही अटींशिवाय पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या प्रमुख वीज प्रकल्पांवर हल्ला करेल.
ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट शब्दांत सांगितले की, दिलेल्या मुदतीत इराणने पावले उचलली नाहीत तर अमेरिका त्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करेल. त्यांनी असेही म्हटले की कारवाईची सुरुवात सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून होईल आणि त्यानंतर इतर ठिकाणांवरही हल्ले केले जातील. हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात आधीपासूनच तणावपूर्ण संबंध कायम आहेत.
होर्मुज सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गाने वाहतूक केला जातो. येथे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि तेलाच्या किमतींवर होऊ शकतो. दरम्यान, एक दिवस आधीच अमेरिकेने इराणी तेल खरेदीवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा हा मोठा ‘यू-टर्न’ मानला जात आहे. होर्मुज सामुद्रधुनी परिसरात इराणी हल्ल्यांच्या भीतीमुळे तेल आणि इतर ऊर्जा संसाधने वाहून नेणारी अनेक जहाजे अडकून पडली आहेत.
यादरम्यान, संयुक्त अरब अमिरात यांच्या नेतृत्वाखाली २२ देशांनी होर्मुज सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांवरील अलीकडील हल्ल्यांबाबत संयुक्त निवेदन जारी करत इराणची कठोर टीका केली आहे. या देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आणि जागतिक समुद्री सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, खाडी प्रदेशात निःशस्त्र व्यापारी जहाजांवर झालेले हल्ले, नागरी पायाभूत सुविधांवरील आक्रमणे आणि होर्मुज सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद करण्याच्या प्रयत्नांचा आम्ही तीव्र निषेध करतो. नेत्यांनी प्रदेशातील वाढत्या तणावाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत इराणने तात्काळ हल्ले थांबवावेत, समुद्री मार्गांमध्ये अडथळे निर्माण करू नयेत आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव २८१७ चे पालन करावे, अशी मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode