
पुणे, 23 मार्च (हिं.स.)।खडकवासला धरण परिसरातील गावांचा पावसाळ्यात संपर्क अखंडित ठेवण्यासाठी नांदेड सिटी-शिवणेदरम्यान मुठा नदीवर नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शिवणे-नांदेडदरम्यानचा पूल एक धरणातून पाणी सोडल्यावर वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी २५० मीटर लांबी आणि अंदाजे ४८ कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
खडकवासला धरणालगतचा पूल सुमारे ६५ वर्षांपूर्वी बांधलेला असून, पाण्याच्या प्रवाहामुळे वापरण्यायोग्य राहिला नव्हता. महापालिकेने दुरुस्ती करून त्याचे आयुष्य १०-१५ वर्षांनी वाढविले. मात्र, धरणाच्या भिंतीपासून २०० मीटर परिसरात बांधकामास मनाई असल्याने येथे नवीन पूल उभारणे शक्य नाही.
शिवणे-नांदेडदरम्यानचा दुसरा पूल कमी उंचीचा काजवे स्वरूपाचा आहे. सध्याच्या ठिकाणी नवीन पूल बांधणे रस्ते अरुंद आणि नदीपात्रात खडक असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्यामुळे सध्याच्या पुलाच्या पूर्वेकडे नांदेड सिटी-शिवणेदरम्यान नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु