
नागपूर, 23 मार्च (हिं.स.) : नागपूरच्या भांडेवाडी बीडगाव परिसरात सोमवारी सकाळी एका फर्निचर कारखान्यात आग लागल्याची घटना घडली. या आगीने लवकरच रौद्र रूप धारण केले. परिणामी परिसरातील 8 गोदामं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आलीत. आगीमुळे भांडेवाडी बीडगाव परिसरातील या गोदामांमध्ये ठेवलेले लाखो रुपये किंमतीचे सामान जळून भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध फायर स्टेशनमधून ९ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीच्या भयानकतेमुळे अतिरिक्त मदतीचीही व्यवस्था करण्यात आली.सुमारे ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. यासंदर्भातील माहितीनुसार गोदामात ठेवलेल्या सुमारे ३ सिलेंडर ब्लास्ट झाल्याने आग आणखी भडकली आणि परिस्थिती गंभीर झाली.दिलासादायक बाब म्हणजे या भीषण दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची मानवी हानी झाली नाही. दरम्यान आगीच्या कारणांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. -------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी