
रायगड, 24 मार्च (हिं.स.) : मंगेश काळोखे हत्या प्रकरणात तपास प्रक्रियेवर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या प्रकरणातील काही आरोपी खुलेआम फिरत असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
थोरवे यांच्या मते, या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक सुधाकर घारे हा सध्या निवडणूक प्रचारात सक्रियपणे सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील फोटो आणि इतर पुरावे पोलिस अधीक्षकांकडे सादर करूनही तपासाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे संकेत मिळत असून, 20 आणि 23 तारखेला संबंधित आरोपींमध्ये संपर्क झाल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्याचा दावा थोरवे यांनी केला. मात्र, या महत्त्वाच्या पुराव्यांनंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याने संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे प्रकरण ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’चे असल्याचा आरोप करत, सर्व संबंधित आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी थोरवे यांनी केली. तसेच, तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.दरम्यान, या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे थोरवे यांनी सांगितले. योग्य तपास न झाल्यास 27 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे आणि माहिती जनतेसमोर मांडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणात अजून काही संशयित आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत असून त्यांचा शोध सुरू आहे. न्यायालयाने काही आरोपींना दिलासा नाकारल्याचेही समोर आले आहे.एकूणच, या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून निष्पक्ष आणि सखोल तपासाची मागणी अधिक तीव्र होत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)