अंधेरीतील भेसळयुक्त दूध प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत होणार कारवाई
मुंबई, 23 मार्च (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केले की अंधेरी परिसरात उघडकीस आलेल्या भेसळयुक्त दूध प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. मनीषा का
Action Under MCOCA Against Accused Andheri Adulterated Milk Case


मुंबई, 23 मार्च (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत जाहीर केले की अंधेरी परिसरात उघडकीस आलेल्या भेसळयुक्त दूध प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

मनीषा कायंदे तसेच इतर आमदारांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. कायंदे यांनी राज्यातील नागरिकांना सुरक्षित व शुद्ध अन्न मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगत भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कोणती उपाययोजना करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

या चर्चेत भाई जगताप आणि अनिल परब यांनीही सहभाग घेत सरकारने भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

मंत्री झिरवाळ यांनी माहिती दिली की वर्सोवा पोलिस ठाण्याच्या पथकाने सात ठिकाणी छापे टाकून दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

आमदारांनी या प्रकरणात संघटित गुन्हेगारीशी संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. भाई जगताप यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी भेसळ माफियाची संपूर्ण साखळी तोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर अनिल परब यांनी मकोका लागू करण्याची गरज व्यक्त करत अशा गुन्हेगारांना सहज जामीन मिळू नये, यासाठी कडक पावले उचलण्याचे आवाहन केले.

मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले की सर्व मागण्यांचा विचार करून संबंधित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande