
नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।
- महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) चे वाहतूक महाव्यवस्थापकमिलिंद बंड यांनी आपला राजीनामा सादर केला असून वरिष्ठ प्राधिकरणाने देखील त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नवीन वाहतूक महाव्यवस्थापक पदी राहूल तोरो यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी त्यांनी श्री. मिलिंद बंड यांच्या हस्ते हा नवीन पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याठिकाणी वाहतूक उपमहाव्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. मिलिंद बंड हे दि. १ ऑक्टोबर २०१९ रोजी नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत शहर बससेवा सुरु करणेकरिता मार्गदर्शक म्हणून दाखल झालेत. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेली शहर बससेवा अर्थातच सिटीलिंकची स्थापना झाल्यानंतर याचठिकाणी दि. १ एप्रिल २०२१ पासून त्यांना वाहतूक महाव्यवस्थापक पदी रुजू करून घेण्यात आले.महाव्यवस्थापक श्री. मिलिंद बंड यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे त्यांच्या कार्यकाळात सिटीलिंकमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. नवीन संकल्पना स्वीकारण्याची तयारी, कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याची क्षमता आणि प्रवासी सेवेला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका यामुळे सिटीलिंकच्या कार्यात लक्षणीय सुधारणा झाली.त्यांच्या कार्यकाळात प्रवासी सुविधांमध्ये वाढ, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सेवा व्यवस्थापनात पारदर्शकता तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे सिटीलिंकला अधिक विश्वासार्ह आणि प्रवासी-केंद्रित सेवा देण्यास मदत झाली.श्री. बंड यांनी नेहमीच “नवीन काहीतरी करण्याची” वृत्ती जोपासली असून, त्यांच्या या दृष्टिकोनामुळे सिटीलिंकमध्ये सकारात्मक बदल घडून आले. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा लाभ प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.दरम्यान, सिटीलिंकच्या वाहतूक महाव्यवस्थापकपदी श्री. राहूल तोरो यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी त्यांनी श्री. मिलिंद बंड यांच्या हस्ते हा नवीन पदभार स्वीकारला आहे. यावेळी सिटीलिंकच्या सेवेत अधिक गुणवत्ता व कार्यक्षमता आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे तोरो यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV