आंतरजिल्हा दुचाकी चोराला अटक, १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 23 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा पोलीस दलाने मालमत्तेविषयक गुन्ह्यांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून अत्यंत कौशल्यपूर्ण व नियोजनबद्ध कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत आरो
लातूर पोलीस


लातूर, 23 मार्च (हिं.स.)।

लातूर जिल्हा पोलीस दलाने मालमत्तेविषयक गुन्ह्यांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून अत्यंत कौशल्यपूर्ण व नियोजनबद्ध कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईदरम्यान आरोपीकडून एकूण ०६ मोटार सायकली (अंदाजे किंमत १,७०,०००/- रुपये) जप्त करण्यात आल्या असून, लातूर तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याच अनुषंगाने पोलीस पथक तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नवीन रेणापूर ते रेल्वे स्टेशन मार्गावरील लातूर बायपास रोडवर एक इसम चोरीची मोटार सायकल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे.

सदर माहितीची शहानिशा करून पथकाने तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचून नमूद ठिकाणी छापा टाकून संशयित इसमास ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव –

महादेव शिवाजी गरड (वय २६ वर्षे, रा. अंबुलगा, ता. चाकूर, जि. लातूर) असे सांगितले.

त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल (MH-35-W-3408) ही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

आरोपीस विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने लातूर शहरातील विविध भागांमधून तसेच पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी परिसरातून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलीस पथकाने अजिंक्य सिटी, लातूर परिसरात छापा टाकून आणखी ०५ मोटार सायकली जप्त केल्या. यामध्ये प्रामुख्याने होंडा कंपनीच्या युनिकॉर्न व शाईन या प्रकारातील मोटार सायकलींचा समावेश आहे.

अशा प्रकारे आरोपीकडून एकूण ०६ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या. तसेच आरोपीने पुणे शहरातील धायरी व सिंहगड रोड परिसरातून आणखी ०५ मोटार सायकली चोरी करून विक्री केल्याची कबुली दिली असून त्या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की –

आपल्या वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, योग्य लॉकिंग प्रणालीचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी पार्किंग करताना दक्षता बाळगावी,संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande