
पुणे, 23 मार्च (हिं.स.) । गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील ५० मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी उर्वरित १३६ कोटी रुपये पुणे महापालिकेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५ यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, १५ एप्रिलपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि ८४ मीटर रुंदीचा कात्रज-कोंढवा रस्ता हा पुणे शहरातील पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेण्यात आला होता. मात्र, भूसंपादनाअभावी रस्त्याचे रुंदीकरण रखडले आणि तुकड्या तुकड्यात हे काम करण्याची वेळ प्रशासनावर आली. वाढत्या खर्चामुळे महापालिका आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात ८४ ऐवजी ५० मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी यापूर्वी अर्धा निधी वितरित करण्यात आला होता, आता उर्वरित रक्कम जमा झाल्याने या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु